यावेळची दाजीपूर अभयारण्य भटकंती अविस्मरणीयच...
महाराष्ट्रातील सर्वात जुने अभयारण्य दाजीपुर गवा अभयारण्य. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी हा भाग शिकारीसाठी राखीव ठेवलेला होता. त्यामुळेच या अभयारण्याचा पाया रचला गेला. प्रत्येक भटकंतीचे अनुभव शेअर केल्याने त्याचा उपयोग नंतर जाणाऱ्या पर्यटकांना नक्कीच होतो म्हणून हा प्रयत्न.
परिस्थितीकी विकास समिती ओलवण व वन्यजीव विभाग कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने साकारलेला "ठक्याचा वाडा तंबू निवास" हा प्रकल्प म्हणजे प्रत्यक्ष जंगलात राहण्याचा अनुभव परंतु पूर्णतः सुरक्षित. याच परिसरात मागील आठवड्यात मुरडा बांबर पाणवठ्यावर पर्यटकांना पूर्ण वाढ झालेला नर जातीचा बिबट्या वाघ दिसला होता. तिथून हाकेच्या अंतरावरच म्हणजे एक किलोमीटरवर हा तंबू निवास आहे. यापूर्वी महाविद्यालय मित्रांसमवेत भटकंती असायची परंतु आमच्या पुढील छोट्या पिढीलाही हा छंद लागल्याने ही भटकंती आता सहकुटुंब.
तंबू निवासस्थानापासून प्रवेशद्वारातून सहज बाहेर पडल्यावर केवळ पन्नास फुटांवर रात्री नऊ वाजता चार ते पाच गव्यांच्या कळपाचे दर्शन झाले. उन्हाळ्यात दाट जंगलातील पाणीसाठा कमी झाल्याने हे वन्यप्राणी बाहेर पडतात. परंतु त्यांना पाणी पिण्याचे मार्गावर जाताना काही अडथळा होऊ न देण्याचे आपले कर्तव्य विसरू नये.
अधिकृत वन्यजीव विभागाचे वाहन घेऊन आम्ही उघड्या जीपमधून जंगल सफारीला बाहेर पडलो .वन्यप्राणी दिसणे हा एक नशिबाचाच भाग असतो. सांबरकोंड ते सावराई सडा मार्गावर आम्हाला शेकरू व त्याचे घरटे, हळद्या पक्षी खारुताई, गरुड, तुरेवाला पक्षी, रान कोंबडा, स्वर्गीय नर्तक, रंग बदलणारा पारवा या पक्षांसह रानटी जायफळ, नरक्या अशा विविध वनस्पती पाहायला मिळाल्या.
सावराई सड्यावर सांबराची शिकार केलेल्या बिबट्या वाघाची ताजी विष्ठा व इतर हालचाली अनुभवास मिळाल्या. वन्यप्राण्यांचे प्रत्यक्ष दर्शन यासोबत त्यांच्या पायाचे ठसे, विष्ठा, झाडावरील ओरखडे याचा अनुभव, अभ्यास, निरीक्षण तेवढेच महत्त्वपूर्ण आहे.
सांबरकोंड वरून परत वाघाचे पाण्याकडे जाताना मधल्या पठारावर अचानक दर्शन झाले तो म्हणजे राधानगरी चा वैभव असणारा "गवा" आमच्याकडे कटाक्ष नजर टाकून यांच्यापासून निश्चितच काही धोका नाही हे ओळखून त्याने आपले चरणे चालू ठेवले. वाटेत तीन ते चार ठिकाणी गव्यांचे कळप पाहून आमची सफारी संपली.
जोपर्यंत तुम्हाला जंगलात भटकताना प्रत्यक्ष वन्य प्राण्याचे मुक्त संचार करताना दर्शन होत नाही तोपर्यंत तुम्हाला जंगलाचे भय वाटत नाही व भटकंतीचा छंद ही लागत नाही. चिंता, उत्साह, आनंद, गोंधळ अशा एकत्रित विचारांचा अनुभव आपल्याला वन्यप्राणी दर्शनानेच मिळतो. येथूनच सुरु होते जंगल फिरण्याचे वेड. दुसर्या दिवशी पहाटे तंबू निवासातून बाहेर पडल्यावर केवळ शंभर ते दोनशे मीटर अंतरावर सरपटणार्या जीवांच्या मातीतील रात्रभर च्या हालचाली, अस्वलाच्या पायाचे ठसे, यासह बिबट्याची व अस्वलाची ताजी विष्ठा, मुंगुसा च्या पायाचे ठसे दिसले. रात्रभर हया वन्यप्राण्यांच्या हालचाली आमच्या सभोवती कशा चालू होत्या एक क्षणभर नजरेसमोर उभे राहिले.
या निवासस्थानावर विजेची सोय नाही आपणास सौरऊर्जेवरील प्रकाशा वरच रात्र काढावी लागते परंतु येथील निवास व्यवस्थापक वन्यजीव कर्मचारी सिद्धेश पाटील व समितीचे कर्मचारी आपणास जिद्द, धाडस, व निसर्ग प्रेमाचा अनुभव याची वेगळीच उर्जा देऊन जातात. गावाकडील पाहुणचार, निसर्गाशी एकरुपता, यांचा अनुभव घेत आपण नकळत त्या जंगलाचा एक भागच होतो. परंतु निसर्गाच्या चक्राप्रमाणे जीवनचक्राचा आपला कार्यभार साधनेसाठी जड पावलाने या परिवाराचा निरोप घेऊन माणसांच्या दाट जंगलात जाण्यासाठी परतीचा प्रवास चालू होतो. तुम्हाला जंगल सफारीचा अनुभव हवा असल्यास मी व माझे निसर्गप्रेमी मित्र तसेच वन्यजीव कर्मचारी सदैव मदतीला असणारच.
असाच जंगलाचा आणखीन एक पुढील माहितीचा खजिना लवकरच.
-
सौरभ मुजुमदार,
तरूण भारत,
कोल्हापूर