आपल्याला जंगलाचं शिष्यत्व पत्करावं लागेल.
Published by मेघश्री श्रेष्ठी in The Western Ghat · Thursday 03 Feb 2022
Tags: Butterflies, of, Radhanagari
Tags: Butterflies, of, Radhanagari
लॉकडाऊन नंतर घरातून बाहेर पडावं, थोडं फिरून यावं असं प्रकर्षानं वाटू लागलं. फक्त कीबोर्ड बडवण्याच्या नादात आपण घर कोंबडे कधी झालो हेच कळलं नाही. अशातच एका मित्राने मंदार वैद्य यांची ओळख करून दिली. त्यांच्या स्टेटसवरील निसर्गरम्य ठिकाणांचे फोटो पाहून तर फिरण्याची इच्छा आणखी आणखी तीव्र होऊ लागली. त्यांना एकदा दोनदा हटकलं देखील. कुठे आहेत ही ठिकाणं? आम्हालाही बघायचं आहे, वगैरे. आम्ही लवकरच ट्रीप प्लन करू तेव्हा कळवू असं ते म्हणाले.
अशातच दोन चार महिने गेले असतील आणि एक दिवस त्यांचा व्हाट्सअपवर मेसेज आला. राधानगरी-दाजीपूर जंगल सफारीचा. ही सहल म्हणजे माझ्यासाठी अगदी पर्वणीच होती. मग काय मी आणि दोन मुलं असं तिघांचीही जागा कन्फर्म केली आणि शेवटी ९ जानेवारी २०२२चा तो दिवस उजाडला. यावर्षात मनसोक्त फिरून घ्यायचं असा संकल्प केलेल्या माझी या वर्षातील ही पहिलीच सहल! पण हा अनुभव नितांत सुंदर होता. इतका की आठवणीच्या गाठोड्यातून काही सुंदर क्षण काढायचे असं ठरवलं तर पाहिलं आठवण होईल ती म्हणजे या टीम सोबत केलेल्या राधानगरी-दाजीपूर परिसराच्या या सहलीची!
याला कारणंही तशीच आहेत.
जंगल पाहणं, जंगल समजून घेणं ही तशी आनंदाचीच गोष्ट ना! निसर्गात तुम्ही गेलात की तो कधीच काहीच हातचं राखून ठेवत नाही. हा अनुभव तुम्हीही घेतलाच असेल. मग त्यातही राधानगरी आणि दाजीपूर सारख्या निसर्ग संपन्न आणि जैव विविधतेने समृद्ध परिसरात जायचं म्हटल्यावर तुम्ही रिकाम्या हाताने परतण्याची शक्यता धूसरच. निसर्ग सौंदर्याने आणि जैवविविधतेने नटलेला हा परिसर तुम्हालाही तितकंच समृद्ध होण्याची संधी देतो. या संधीचं सोनं कसं करायचं हे मात्र आपल्या हातात आहे.
ठरल्या प्रमाणे आम्ही त्यादिवशी सकाळी रंकाळा तलावाकाठी जमलो आणि इथून आमच्या सहलीला सुरुवात झाली. या सहलीतील पाहिलंच ठिकाण होतं राधानगरीचं फुलपाखरू उद्यान!
राधानगरीच्या या उद्यानाला यापूर्वीही भेट देण्याचा योग आला होता पण, या सहलीतून या उद्यानाकडे पाहण्याचा जो दृष्टीकोन मिळाला तो आधीच्या भेटीत मिळाला नव्हता. हे उद्यान म्हणजे फुलपाखरांचे माहेर. फुलपाखरांचे जतन आणि संवर्धन करण्याच्या हेतूने या बागेची रचना करण्यात आलेली आहे. या भेटीत आम्हाला वेगवेगळ्या आकाराची, प्रकारची किती तरी फुलपाखरं इथं बघायला मिळाली. फुलपाखरांचा जीवनक्रम कसा असतो आणि छोट्याशा आयुष्यात त्या या जगला किती भरभरून देतात हे ऐकल्यानंतर, समजून घेतल्यानंतर तर, फुलपाखरांबद्दलचा आदर आणखीनच वाढला. फुलपाखरांना आकर्षित करणारी विविध प्रकारची झाडं तिथे मुद्दाम वाढवण्यात आली आहेत. ज्यामुळे फुलपाखरांना आवश्यक पर्यावरण निर्माण होईल.
फुलपाखरू म्हणजे फक्त एक सुंदर कीटक एवढंच माहित होतं. पण, हा कीटक फक्त दिसायलाच सुंदर नाही तर त्याचं कामही त्याहून सुंदर आहे, याची जाणीव पहिल्यांदा या सहलीत झाली.
त्यानंतर आमचा मोर्चा वळला हत्ती महालाकडे! राधानगरी धरणाचं दुरूनच होणारं पण, डोळे दिपवून टाकणारं दर्शन आणि त्या सोबत जोडलेल्या छत्रपती शाहूंच्या आठवणी! मनात आपसूकच एक कृतज्ञतेची भावना तयार होते. नकळत या कार्यापुढे आपण आतून नतमस्तक होतो. हत्ती महाल आता काहीसा मोडकळीस आला असला तरी, त्याची रचना, बांधकाम आणि त्याकाळचा त्यामगचा दृष्टीकोन जाणून घेतल्यानंतर हा ऐतिहासिक ठेवा जपण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत असं कळकळीनं वाटू लागतं.
यानंतर आम्ही पुन्हा गाडीत बसलो सोबत असलेल्या बच्चे कंपनीचा चिवचिवाटामुळे प्रवास आणखी गमतीशीर, रंजक होत होता. कुठेही कंटाळा नावाची गोष्ट मनाला शिवली देखील नाही. बोअर होणं काय असतं हे त्या एका दिवसात तर आम्ही पार विसरून गेलो होतो.
त्यानंतर आम्ही थांबलो हासण्याची देवराई पाहायला. शांत, प्रसन्न, तजेलदार आणि पोषक हवा काय असते? याचा अनुभव इथे आला. पावसाळा संपला तरी इथली हिरवळ ताजीतवानी होती. मन प्रसन्न करण्यासाठी हे ठिकाण खूपच म्हणजे खूपच चांगलं आहे. सोबतच्या तज्ज्ञ लोकांनी इथल्या झाडांची विविध प्रकारची माहिती दिली, त्यांची वैशिष्ट्य सांगितली. पण आता ती काही फारशी लक्षात नाहीयेत. एवढं नक्की कळलं की निसर्गातील छोट्यातील छोटी गोष्ट सुद्धा निसर्गाच्या, पर्यावरणाच्या भरभराटीत भरभरून आपलं योगदान देत असते.
उगवाई मंदिरामागच्या जंगलात थोडं अंतर चालून गेलो. सोबत आजूबाजूच्या वेगवेगळ्या झाडांची माहिती कानावर पडतच होती. थोडाशा अंतरावर गेल्यावर समोर जो नजारा होता तो पाहून मी तर दिड्मूढ झाले. समोर शेकडो फुलपाखरांचा थवा पंख फडफडवून आपल्या अस्तित्वाचा सोहळा साजरा करत होता. फुलपाखराचं आयुष्य ते किती? तर फक्त चाळीस दिवस. तेही असंख्य संकटं झेलावी तेव्हा मिळणारं. या चाळीस दिवसाच्या आयुष्यात फुलपाखरं किती आनंदानं जगतात आणि नुसती जगत नाहीत तर या इतुक्याशा कालवधीत ती आपल्यातील हजारो लोकांच्या पोटापाण्याची सोय करून जातात. निसर्गातील किती छोट्या घटकावर किती मोठी जबाबदारी आहे बघितलंत? आणि आपण चाळीस वर्षापेक्षाही जास्त दिवस जगणारी माणसं निसर्गाला काय देतो? हा प्रश्न पडला, जाणवला, हेच या सहलीच खरं यश आहे.
समोर बागडणाऱ्या शेकडो फुलपाखरांचा थवा बघून तर सहलच काय पण अख्खं आयुष्य सार्थकी लागल्याचा अनुभव आला. स्वर्ग, स्वर्ग म्हणतात तो हाच की काय? अशी कुतूहलाची आणि कृतज्ञतेची भावना जागृत झाली. यापेक्षा सुंदर असं या जगात पाहण्यासारखं काही असेल का? अजिबात नाही! तो क्षण, ते दृश्य साठवण्यासाठी कॅमेऱ्याची गरजच नव्हती. मनःचक्षुंनी तो प्रसंग असा काही टिपला आहे की, राधानगरी म्हटलं की अपोआपच ती शेकडो फुलपाखरं डोळ्यासमोर नाचू लागतात.
त्यानंतर आम्ही दाजीपूरच्या प्रवेशद्वाराशी थांबलो. आत जाण्याइतपत वेळ हाताशी नव्हता. त्यामुळे तिथल्या आजूबाजूच्या परिसरात थोडी सैर केली. शिवगडाचं दुरूनच दर्शन घेतलं. एकूणच परिसर आणि तिथलं सौंदर्य पाहून मन तिथेच हरवून गेलं. मनाची चलबिचल शांत झाली. कुठलाच विचार मनाला शिवणार नाही इतकी शांतता अनुभवायची असेल तर हा परिसर एकदा पाहायलाच हवा. स्वतःला विसरण्याचा, हरवण्याचा अनुभव ज्यांना घ्यायचा आहे, त्यांनी तरी आवर्जून इथे भेट द्यावी. अंतर्यामी परिवर्तन अनुभवण्यासाठी एक उत्तम ठिकाण!
जंगल आहे तर आपण आहोत. आपल्या जगण्यासाठी जितकी आवश्यक आहे तितकी सुद्धा जंगल संपत्ती आपण राखून ठेवलेली नाही. येणाऱ्या पिढ्यांना पुरेल, वाचवेल इतका निसर्ग आपण जपलेला नाही. याची जाणीव सुहास सरांनी करून दिली.
जंगल म्हणजे आपला गुरु आहे. जंगलाला शरण जाणाऱ्या माणसा इतकं समृद्ध आयुष्य कुणालाच मिळणार नाही. छोट्यातील छोट्या तृणापासून ते हत्ती, गेंडा आणि गव्यासारख्या मोठमोठ्या प्राण्यापर्यंत इथे प्रत्येकाची भूमिका ठरलेली आहे. प्रत्येकजण आपली भूमिका प्रामाणिकपणे वठवतो. आपल्या भूमिकेशी प्रामाणिक राहण्यातच त्यांना आनंद आहे. जंगलाकडून ही एक महत्वाची गोष्ट शिकायला मिळते.
“हम ना सोचे हमे क्या मिला है, हम ये सोचे किया क्या है अर्पण,” अशी प्रार्थना आपण रोज म्हणत असलो तरी जंगलातील प्रत्येक घटक ही प्रार्थना जगताना दिसतो.
‘जंगल मे मंगल’, ही म्हण कशी निर्माण झाली माहिती नाही, पण एवढं नक्की आहे, की जंगल मे मंगल असेल तरच संपूर्ण जीवसृष्टी सुखनैव जगू शकते. आपलं जीवनही मंगल बनवायचं असेल तर जंगल जपणं, खूप महत्वाचं आहे. यासाठी फार काही नाही तरी किमान मी निसर्गातील कुठल्याच घटकाला त्रास होईल असं वागणार नाही, झाडच काय पण झाडाचं पान आणि फुलही तोडणार नाही इतकी छोटी प्रतिज्ञा करणं आणि ती जगणंही पुरेसं ठरेल.
याशिवायही आपल्या क्षमतेनुसार, कुवतीनुसार आपण बरच काही करू शकतो आपण. पण, त्यासाठी जंगल समजून घेणं ही पहिली पायरी आहे.
आयुष्यात जसा एक सच्चा, प्रामाणिक, खंबीर मार्गदर्शक गरजेचा असतो ना तसाच जंगल सफरीत एका अनुभवी, सच्चा आणि जंगलाविषयी तळमळ असणारा वाटाड्या सोबत असणं खूप खूप महत्वाचं असतं. त्याशिवाय जंगलातील 'ज' सुद्धा आपल्याला समजणार नाही. आमच्या सुदैवाने या सहलीत आम्हाला सुहास वायंगणकर आणि कृतार्थ मिरजकर सरांसारखे सच्चे वाटाडे भेटले. त्यांचं जंगला विषयीचं ज्ञान तर अफाट आहेच पण त्याहूनही मोठी आहे जंगलाविषयीची कळकळ, प्रेम आणि कृतज्ञता.
या दोघांनीही जी माहिती देऊन आम्हाला समृद्ध केलं, आम्हाला जंगलाकडे पाहण्याची सजगता दिली आणि जंगलाबद्दल आमच्या मनात कृतकृत्य भाव जागवला त्याबद्दल आम्ही सदैव त्यांच्या ऋणात राहू. त्यांच्या तळमळीचा एक टक्का जरी आम्ही अंगी बाणवू शकलो तरी आमचे आयुष्य खूप खूप समृद्ध आणि सुखी होईल, यात शंका नाही.
येणाऱ्या पिढ्यांसाठी तुम्ही किती बँक बॅलन्स मागे ठेवताय ते महत्वाचं नाही तर तर त्यांच्या सुखनैव भविष्यासाठी निसर्ग जपणं महत्वाचं आहे.
निसर्गातील प्रत्येक घटक इथे काही तरी देऊन जातो, हे जग अधिक सुंदर करण्यास हातभार लावतो. आपणही हेच शिकलं पाहिजे. आपला जन्म घेण्यासाठी नाही तर देण्यासाठी कसा सार्थकी लावता येईल, हे शिकायचं तर, आपल्याही अस्तित्वाचा सोहळा साजरा करायचा असेल तर, तुम्हाला जंगलाचं शिष्यत्व पत्करावं लागेल.
भवतु सब्ब मंगलम!
मेघश्री श्रेष्ठी