निसर्गाला 'थॅंक यू' म्हणायला विसरू नका
मंडळी, सृष्टीतील सहचरांसोबत जगताना माणूस म्हणून आपल्याला ज्या वेगळ्या देणग्या लाभलेल्या आहेत त्यापैकी भव्यता, अप्रूप अशा काही जाणिवा आहेत. या जाणिवांमुळेच आपल्याला जगातली अनेक नैसर्गिक आश्चर्ये खुणावतात व त्याबद्दल अधिक जाणून घेण्यास प्रोत्साहित करतात.
अशाच भौगोलिक आश्चर्यांपैकी एक म्हणजे भारताच्या पश्चिम दिशेला, महाराष्ट्र - गुजरातच्या सीमेपासून कन्याकुमारीपर्यन्त पसरलेली साधारण सोळाशे किलोमीटर लांबीची पश्चिम घाट नावाची भव्य पर्वतरांग. जणू एक हिरवी - करडी भिंतच. कोकण आणि देशाला जोडणार्या कुठल्याही घाटरस्त्याच्या पायथ्याच्या गावातून पूर्वेकडे पाहिलं की या भिंतीची अवाढव्यता डोळ्याचे पारणे फेडते. आज जरी हे सगळे डोंगर हिरवेगार दिसत असले तरी त्यांची निर्मिती पृथ्वीच्या गर्भातून प्रसवलेल्या धगधगत्या लाव्हारसापासून झालेली आहे.
साधारण चौदा कोटी वर्षांपूर्वी आपला भारताचा त्रिकोण आज दिसतोय तिथे नसून दक्षिण गोलार्धात ऑस्ट्रेलिया खंडापाशी होता. नंतरच्या काळात पृथ्वीच्या पोटातील भूपट्टांच्या हालचालींमुळे त्याने उत्तरेकडे हजारो किलोमीटर्सचा प्रवास करून आजची जागा पटकावली. या प्रवासात सुमारे साडेसहा कोटी वर्षांपूर्वी आफ्रिका खंडाजवळील मादागास्कर बेटाजवळून जाताना तिथल्या भूगर्भातील सक्रिय ज्वालामुखींमुळे पश्चिम किनार्यावर लाव्हारसाच्या अक्षरशा: हजारो नद्या वाहू लागल्या व सुमारे तीस ते चाळीस हजार वर्षात टप्प्याटप्प्याने थरांवर थर रचले जाऊन पश्चिम घाट पर्वत रांगेमधील महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांग व दख्खनचे पठार तयार झाले.
प्रवासाच्या या टप्प्यातून पुढे सरकल्यावर अशी जाळपोळ करणारे ज्वालामुखी नंतर वाटेत आले नाहीत म्हणून इथे जीवन स्थिरावू शकले.
सह्याद्री रांगेच्या निर्मितीचे, त्यातल्या दगडांच्या रासायनिक रचनांनुसार तीन मुख्य कालखंड मानले जातात. पहिला म्हणजे नाशिक किंवा कळसूबाई खंड जो सर्वात आधी तयार झाला ज्यामुळे तिथे कळसूबाईसारखे सर्वात उंच शिखर आहेच पण नाशिक विभागातील डोंगरसुद्धा अधिक झिजलेले आहेत. नंतर येतो लोणावळा खंड जो माथेरानपासून साधारण प्रतापगडपर्यन्त पसरला आहे. तिसरा आणि शेवटचा खंड म्हणजे वाई खंड जो महाबळेश्वरपासून गोवा - कर्नाटक सीमेवरील देसूर पर्यन्त पसरलेला आहेत.
कोणे एके काळी पार इंदोरच्या वरपर्यंत व्याप्ती असलेला आणि सुमारे पंधरा लाख चौरस किलोमीटर इतका अजस्त्र पसारा असलेला हा प्रदेश आता झिजून झिजून पाच लाख चौरस किलोमीटर एवढा उरलेला आहे. पण तरीही या अभेद्य भिंतीमुळेच मान्सूनचे वारे अडून या कोकण आणि घाटावर प्रचंड पाऊस पडतो. त्यामुळे पश्चिम घाटात वनस्पती व प्राणी यांचे अद्भुत वैविध्य आढळते. पण पावसाच्या याच अडवणुकीमुळे बिचारे दख्खनचे पठार मात्र शुष्कच राहते.
आपल्या कोल्हापुरातील राधानगरी अभयारण्य हे याच पश्चिम घाटाची देणगी आहे.
म्हणून, यापुढे फोंडा, अणुस्कुरा किंवा गगनबावडा घाटातून प्रवास करताना उत्तुंग डोंगर पाहायला क्षणभर थांबलात तर निसर्गाला 'थॅंक यू' म्हणायला विसरू नका.
-